कुणीही यावे, टपली मारूनी जावे !

हल्ली मुंबई ठप्प व्हायला किडूकमिडूक कारणही पुरतं आणि मुंबईकरांचं आधीच असह्य असलेलं जगणं अधिक विस्कळीत करायला कुणीही उपटतं. आज सकाळीही नेमकं तेच झालं.

हल्ली मुंबई ठप्प व्हायला किडूकमिडूक कारणही पुरतं आणि मुंबईकरांचं आधीच असह्य असलेलं जगणं अधिक विस्कळीत करायला कुणीही उपटतं. मंगळवारी सकाळीही नेमकं तेच झालं. मुंबई उपनगरीय मध्य रेल्वेच्या मेन लाइनने दररोज सुमारे २३ लाख प्रवासी प्रवास करतात. आज रेल्वे परीक्षणार्थी विद्यार्थ्यांनी सकाळी पुकारलेल्या बंदने मुंबईकर-उपनगरीवासियांचे कामाचे साधारण एक कोटी तास वाया गेले, कशीबशी धावपळ करून चार-पाच तासांनी कार्यालय गाठताना चाकरमान्यांची झालेली दैना लक्षात घेणार तरी कोण?

इतक्या मुंबईकरांना वेठीला धरले, म्हणून आंदोलक विद्यार्थी आंदोलन यशस्वी झाल्याच्या अविर्भावात वावरतायंत, टीव्ही चॅनल्सवर आपली छबी झळकली, म्हणून कॉलर ताठ करतायंत पण ज्यांनी करापोटी भरलेल्या पैशांवर रेल्वे चालते, तो सर्वसामान्य माणूस मात्र रुळांवर थांबलेल्या ट्रेनमधून उडी मारत जवळचे रेल्वे स्थानक गाठण्याचा आटापिटा करत होता. साऱ्याच वाहतुकीचा बट्ट्याबोळ झालेला असल्याने दहावीचे तसेच महाविद्यालयीन परीक्षार्थी व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचू का, याचा तणाव स्पष्ट दिसत होता. मध्य रेल्वेचे प्रवासी जमेल तसे नजीक पडणाऱ्या पश्चिम रेल्वे स्थानकात पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याने आधीच सकाळच्या वेळेत तुडुंब वाहणारी पश्चिम रेल्वे पुरती पॅक होऊन धावत होती. पश्चिम द्रूतगती मार्ग, पूर्व द्रूतगती मार्ग, घोडबंदर रोड, जोगेश्वरी लिंक रोडवर वाहतुकीची जबरदस्त कोंडी झाली होती. तिथे फसलेले अनेकजण तीन-चार तास रखडल्याने घरी परत फिरले.

आंदोलनातील ताकद दाखवून द्यायला मुंबईकरांना वेठीला धरण्याचा शिरस्ता तसा जुनाच, पण आता तो कुणीही वापरू लागले आहे. अशा वेळी कायद्याचे राज्य सर्वसामान्यांसाठी खरोखरच आहे का, हा प्रश्न आजही असंख्य मुंबईकरांच्या मनात उमटला. प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्याने रेल्वेत नोकरी मिळण्याच्या मागणीसाठी रेल रोको करताना लाखो मुंबईकरांना त्यांनी सक्तीची सुट्टी घ्यायला लावली. मध्य रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे २३ लाख चाकरमान्यांचे सरासरी चार-पाच तास वाया घालवत कोट्यवधी कामांच्या तासांचा चक्काचूर केला. या प्रवाशांमध्ये अपंग व्यक्ती असतील, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यांना झालेल्या त्रासाची जबाबदारी कोण स्वीकारणार? त्यांच्यासारखेच कितीतरी नोकरीइच्छुक युवावर्ग मुलाखतीसाठी जात असेल, त्यांची संधी नाकारणाऱ्यांना कुठले शासन होणार, हे प्रश्न आज कुणी विचारतही नाही, कारण समर्थ उत्तर देणारं कुणीही सामान्यांच्या बाजूने उभं नाही, ही आज सामान्य माणसाची शोकांतिका आहे.

आज सामान्य मुंबईकराला तीव्र आठवण आली ती उन्हातान्हात खडतर प्रवास करूनही आंदोलनाने चालूनही दहावीच्या मुलांना त्रास होऊ नये, म्हणून पुन्हा रात्रभर चालणाऱ्या शेतकरीराजाची ! सहवेदना माणसामाणसाला जोडते, पण ती जर नसेल आपली ताकद दाखवून देण्याकरता दुसऱ्याला लक्ष्य करायला पहिल्याला चेव चढतो. मुंबईने आज आंदोलनकर्त्यांची हीच बेफिकिरी अनुभवली.