दिनक्रम… सरकारी कर्मचाऱ्यांचा !

मंत्रालयात गेल्या काही दिवसांत हतबल होऊन घडलेल्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'बिझी शेड्यूल'ची ही एक झलक !

कितीतरी वेळा खेटे घालूनही काम होत नसल्याने मंत्रालयात गेल्या काही दिवसांत हतबल होऊन शेतकरी, बेरोजगार, कष्टकऱ्यांच्या घडलेल्या आत्महत्या आणि त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून मंत्रालयात संरक्षक जाळी बसवले जाणे… या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथे काम करणाऱ्या प्रातिनिधिक कर्मचाऱ्याचा दिनक्रम जाणून घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘बिझी शेड्यूल’ची ही एक झलक !

सक्काळी सक्काळी नऊ-साडेनऊच्या सुमारास लोकल ट्रेन एकदाची सीएसटी किंवा चर्चगेट स्टेशनला पोहोचली की, ती पुरती थांबायच्या आतच भराभर आतले बाहेर पडतात आणि त्यातले अनेक चक्क धावायला लागतात, ऑफिसच्या दिशेने! धावणारे बघून समजायचं की यातले बरेचसे सरकारी कर्मचारी आहेत. मुंबईतल्या गव्हर्नमेन्ट ऑफिसमध्ये मानाचं टेबल सांभाळणाऱ्या अशाच एका मॅडमशी त्यांचं रोजचं रुटिन जाणून घेण्याचा प्रयत्न केला… जुनी ओळख म्हणून त्यांनी माहितीही जराही हातचं राखून न ठेवता दिली… जाणून घेऊया, सरकारी कर्मचाऱ्यांचा एक दिवस!

बायोमेट्रिक यंत्रणा लागू झाल्यापासून ऑफिसला वेळेवर पोहोचायला लागतं, नाहीतर लेटमार्क, मग हाफ डे जायची भीती! एकदा का बायोमेट्रिक यंत्रावर बोट उमटले की मात्र, दिवस भरलाच समजायचा!मग कॅन्टिनमध्ये रेंगाळले, बँकेची पर्सनल कामं करायला बाहेर पडलं किंवा गावच्या जमिनीची चर्चा करायला भावाच्या फोर्टमधल्या ऑफिसमध्ये गेलं तरी तसं कुणी विचारायचं नाही. जागेवर बॅग, डबा-बाटली असली तरी आज आलेय हे कळतं इतरांना!

तसं दहाचं ऑफिस. वेळेवर पोहोचून बँकेबिंकेची कामं असली तर ती करून, नाश्ता करून जागेवर परतेपर्यंत तसे अकरा-साडेअकरा होऊन जातात. मग कामाला लागणं होतं, काही फोनही करायचे असतात आप्तस्वकियांना ! हाच काय तो वेळ मिळतो, नाहीतर घरी उशिरा, दमूनभागून पोहोचून कुणाशी संपर्क करणं- नातं राखणं अलीकडे कुठे शक्य होतं ? इ-मेल चेक करायचे असतात, वॉट्सअँप चेक करायचं असतं, नाहीतर कुठला वेळ मिळायला?

दीड वाजेपर्यंत भूक जाम खवळते. मग डबा घेऊन कॅन्टिनकडे पळायचं. आठवड्याला एक दिवस तसं बाहेर खाण होतं, कुणाच्या वाढदिवसाची नाहीतर आणखी कशाची ना कशाची पार्टी असते… बाहेर गेलं तर तसा जास्तच वेळ मोडतो, पण साहेबापासून सारेच असतात, तर मग चोरी कशाची ! शेवटी काय, वातावरण उमदं असलं की काम करायचा साऱ्यांनाच हुरूप येतो. पण खरं सांगू, हुरूप येईपर्यंत ऑफिस सुटायची वेळ- आणि ट्रेनसाठी पळत सुटायची वेळ होते. तरी अलीकडे एखादं चांगलं प्रदर्शन, खरेदीसाठी फिरणं तितकंसं जमत नाही, फायलींचा ढिगारा कमी करायचा दंडक आहे ना साहेबांचा! मध्ये तर पेपरलेस ऑफिसची टूम निघाली होती, युनियनला सांगून मोडून काढली ती आयडिया ! शक्य तरी आहे का ? इतक्या वर्षांच्या मेंटेन केलेल्या फाइल्स… कशा अपलोड करणार ? आणि ते काम करणार तरी कोण ? आधीच आमचं काम आम्हाला होईनासं झालंय, त्यात हा अधिकचा भार कोण सहन करणार ? तसं अलीकडे कॉम्प्युटर शिकणं मस्ट केलंय… परीक्षा द्यावी लागते… नोकरी करायचीय, द्यावी लागली. पण एक सांगू, या कॉम्प्युटरचे फायदेही अलीकडे लक्षात येऊ लागलेत. इंटरनेटमुळे तर ई-मेल चेक करता येतात, फेसबुकवर साऱ्यांची खबर ठेवता येते… नवरा आणि मुलं म्हणू लागलीत- आई, तू एकदम कॉम्प्युटर सॅव्ही झालीस ! बरं वाटतं… पण तरीही, आता पूर्वीसारखं नाही राहिलं, काम वाढलंय, जिथे आमच्या डिपार्टमेन्टमध्ये आधी २०-२० जण होते, तिथं आता आम्ही सात-आठ जण आहोत. एखादा कोण ना कोण सुट्टीवर असतोच. आमच्याकडेही कधीकधी मात्र उपस्थिती एकदम १०० टक्के असते बरं का! सत्यनारायणाची महापूजा, कुणाचा निरोप समारंभ असला की सहसा कुणी गैरहजर राहात नाही, पण त्या दिवशी इतक्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात ना अंगावर, की कामाकडे बघायलाही फुरसत नसते.

तर मी सांगत होते, आता पूर्वीसारखं नाही राहिलं, नाहीतर सुरुवातीला मैत्रिणींबरोबर दुपारचे किती फिल्म शो पाहिलेत, भाजी खरेदीपासून सारी कामं व्हायची, साड्यांच्या प्रदर्शनाला भेट तर ठरलेली असायची… आता कित्येक वेळा ठरवूनही जाता येत नाही… लंच नंतर कधीकधी निघतो आमचा ग्रूप, पाय मोकळे करायला म्हणून सांगून खरेदीला जातोही, पण अर्ध्या तासात परतावं लागतं. तुम्हीच सांगा, खूर्चीवर सारखं बसणं योग्य का? जेवल्यावर जरा राऊंड मारायला नको का ? तब्येतीकडेही पाहायला हवं की नाही ? पण आमच्या ग्रूपसारखे सारे उत्साही नसतात… काही खरंच बिच्चारे दमून जातात. ब्लड प्रेशर असणाऱ्यांना त्यांच्या गोळ्या, औषधांनी डोळे जड होतात, कल्याण, बदलापूर नाहीतर विरारहून रोजचा प्रवास करणारी अशी ही सारी मंडळी लंच झाल्यावर टेबलावरच डोकं टेकून एक डुलकी घेतात- ही सोय साऱ्यांना नाही बरं. आमच्या विभागात सीसीटीव्ही-बीव्ही काही नाही लावलंय, म्हणून चालतं. आम्ही साडेतीन पर्यंत बाहेरची कामं आटोपून आलो की त्यांना उठवतो. दरम्यान माहिती घ्यायला कुणी कुणी येऊन गेलं, असं सांगतो काशीराम… आमचा शिपाई, पण अशा वेळी काय सांगायचं त्याला इतक्या वर्षांच्या अनुभवाने ठाऊक आहे !  आणि आमच्या डोक्यावर पण किती काम असतं, त्यालाही ठाऊक आहेच की ! तो किती कामचुकारपणा करतो आणि कसे पैसे खातो, हे काय आम्हाला ठाऊक नाही ! आम्ही त्याला सांभाळतो आणि तो आम्हाला. फिट्टमफाट.  कुणी एखादा दुरून माहिती घ्यायला आलेला आमची वाट बघत ताटकळत थांबलेला असतो… लोकांना ना अजिबात पेशन्स म्हणून नाही. पहिल्याच वेळेला येऊन तुमचं काम व्हायला हे काय कॉर्पोरेट ऑफिस आहे… इतक्या फायलींमधून माहिती शोधा, काय खाऊ आहे ? बहुतेकदा आमच्या आधीच्या चुकार लोकांनी नीट रेकॉर्डही ठेवलेले नसते… मग कशी देणार आम्ही तुम्हाला माहिती ?  पण आमची व्यथा समजून घेतंय कोण ? फक्त हे ‘गव्हर्नमेन्ट सर्व्हन्ट असेच’ म्हणत आमच्या नावाने बोटं मोडतात, हे लोक. अलीकडे तर मंत्रालयात आत्महत्याच करायला लागलेत हे लोक. जाळून काय घेतात, वरच्या मजल्यावरून उड्या काय मारतात? या सगळ्याचं आमच्या कामावर किती प्रेशर येतं, तुम्हाला कल्पना नाही येणार. सरकारी कर्मचाऱ्यांचं काम पूर्वीसारखं राहिलेलं नाही- आता रजाही पाहिजे तशा घेता येत नाही. उगाच खोटेपणा करावा लागतो मग. तुम्हीच सांगा, कुणाला आवडतं का खोटी मेडिकल सर्टिफिकेट दाखवायला ? पण चार दिवस बाहेरगावी जायचं झालं, तर त्यावाचून पर्याय राहिलेला नाही.

आणि ही जी नवी भरती मध्ये मध्ये होते, ते नवे लोक पटापटा कामं करतात आणि रचून ठेवतात आमच्यापुढे फाइल्स- रिव्ह्यूसाठी. किती वेळा सांगितलं त्यांना- जरा हळूहळू, पुरवून पुरवून करत जा कामं. पण ऐकतील तर शप्पथ. तरी अलीकडे भिशी चालवायला, फंड चालवायला वेळ मिळत नाही. काम वाढलंय हो ! कित्येकांनी कंटाळून स्वेच्छा निवृत्तीही घेतली. खूश आहेत फुल बेनिफिट मिळालेल्या पेन्शनवर. पण मी ठरवलंय, जमतंय, झेपतंय- तितकं करायचं. नाहीतर आहेच स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय. सुखाने पेन्शन उपभोगायला पुढचं आयुष्य पडलंय- तोपर्यंत ही जनसेवा करायची. पाहिलं, तुम्हाला सांगायला गेले नि पाच वाजत आलेच की. जरा आवरून येते… केसावरून कंगवा, चेहऱ्यावर पफ नाही फिरवला तर.. अगदी अवतार दिसतो.. साडेपाचला बायोमेट्रिकवर बोट टेकवून निघायला हवं, ५.४५ ची लोकल तरी मिळायला हवी, म्हणजे भाजी घेऊन घरी जाता येईल.

READ MORE – How can corruption be eliminated from India?