या दहा+१ चाली खेळून राहुल गांधी भारताचे आगामी पंतप्रधान बनू शकतात.

२०१४ मध्ये मिळालेल्या ४४ जागांपेक्षा अधिक जागा काँग्रेसने मिळवायला हव्या. प्रश्न हा आहे की, ते किती स्तरापर्यंत उंचावू शकतात. त्यांचे पहिले उद्दिष्ट नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदापासून रोखणे असे असायला हवे- म्हणजे भाजपला २३० हून कमी जागा मिळतील. याचा अर्थ काँग्रेसला १००हून अधिक जागा मिळण्याची गरज आहे. भाजपने आणि काँग्रेसने लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३३० जागा जिंकल्या, उर्वरित जागा प्रादेशिक पक्षांना मिळाल्या, जे काँग्रेस किंवा भाजपपैकी कुणालातरी पाठिंबा देतील किंवा देणार नाहीत.

दुसरे उदिद्ष्ट हे बिगर भाजप सरकार येण्याची तजवीज करणे, ज्याचा अर्थ भाजपला २०० हून कमी जागा मिळायला हव्या, त्याकरता काँग्रेसला १३० जागा मिळायला हव्या. तिसरे उद्दिष्ट आणि ज्याची आपण येथे चर्चा करत आहोत, ते म्हणजे काँग्रेसला १५० जागा मिळाल्या, ज्याचा अर्थ भाजप आपल्या आधीच्या १८० अथवा तत्सम जागांवर परत जाईल. याच परिस्थितीत राहुल गांधी काँग्रेस सरकारचे नेतृत्व करू शकतील आणि आगामी पंतप्रधान होऊ शकतील. तर मग, हे कसे घडू शकेल?

पंतप्रधान खात्रीने राहुल गांधी व्हावेत, याकरता काँग्रेस १० चाली खेळू शकतात.

१. स्वातंत्र्याची चाल

काँग्रेसने स्वत:करता नवे स्थान निर्माण करण्याची गरज आहे. गेल्या तीनहून अधिक वर्षे भाजप पद्धतशीरपणे गरीब, दलित आणि आदिवासी ही काँग्रेसची निष्ठावान व्होटबँक आपल्याकडे खेचत आहे. भाजप ही नवी काँग्रेस बनली आहे. काँग्रेसला नव्या कल्पना लढविण्याची आवश्यकता आहे आणि या कल्पना म्हणजे प्रत्येक विभागाला काहीतरी सवलतीचे आश्वासन देणारा ३० पानी जाहीरनामा होऊ शकत नाही, जसे गुजरातमध्ये देण्यात आले होते. आतापर्यंत राजकीय पक्षांना कळून चुकले असेल की, विरोधकांखेरीज कुणालाही जाहीरनाम्यात स्वारस्य नसते. काँग्रेसला त्यांच्या नावामागे जोडलेला ‘भ्रष्ट’ हा उपसर्ग सोडविण्यावर काम करायला हवे. निवडणुका या एक ते दोन मोठ्या कल्पनांवर जिंकल्या अथवा हरल्या जातात. एक वेगळी मोठी कल्पना ज्यावर काँग्रेसने सहनिवड करायला हवी, ती म्हणजे सर्वसमावेशक स्वातंत्र्य- संपूर्ण स्वातंत्र्य. व्यक्तिगत, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य हे नोकरी आणि समृद्धीचा पाया रचतात. १९४७ च्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी याला जोडता येईल. मात्र, त्याकरता, काँग्रेसने समाजवादाची पांघरलेली कातडी झटकायला हवी. (जी आता भाजपने पांघरली आहे.) ही सर्वात कठीण गोष्ट आहे, जी काँग्रेसने करणे गरजेचे आहे. आता टक्केवारीचे गणित खेळून त्यांना विजयी होता येणार नाही.

२. जागांच्या निवडीची चाल

५४३ पैकी काँग्रेस जिंकू शकतील, अशा २०० जागांवर काँग्रेसने आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या जागा कोणत्या, ते माहितीच्या आधारे शोधता येईल. याकडे सारे लक्ष पुरवणे आवश्यक आहे आणि सारे स्रोत याकडे वळवणे आवश्यक आहे. त्याकरता उच्च स्तरीय राष्ट्रीय अथवा राज्याकरता असे विशिष्ट धोरण आखण्याऐवजी प्रत्येक जागेकरता एक सूक्ष्म धोरण आखायला हवे. या २०० जागांपैकी दीडशेहून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट काँग्रेसने समोर ठेवायला हवे.

३. चिन्हाची चाल

गेल्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये मोठी आघाडी घेऊनही हे लक्षात घ्यायला हवे की, ६० टक्के मतदारांनी भाजपला मत दिले नव्हते. यांतून स्पष्ट संदेश निघतो : १९७७ मध्ये इंदिरा गांधींच्या काँग्रेसचे जनता पार्टीने केले होते, तेच नरेंद्र मोदींच्या भाजपचे काँग्रेसने करायला हवे. एक जागा, एक भाजपविरोधी उमेदवार. जर एक राज्य, एक भाजपविरोधी चिन्ह असेल तर अधिक उत्तम. अर्थात, हे बोलणे प्रत्यक्षात आणण्याहून सोपे आहे आणि हे होऊ नये, याकरता भाजपची काही ना काही योजना असेलच. मात्र, भाजपच्या विस्तारामुळे अनेक प्रादेशिक पक्ष सावध झाले आहेत, कारण भाजपमुळे प्रादेशिक पक्षांच्या स्थानिक लाभांना धक्का पोहोचतो. त्यामुळे काँग्रेसने आपले शत्रूत्व दूर ठेवत एकेरी निवडणूक लढवण्याकरता इतर पक्षांची मनधरणी करायला हवी. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाबिगरचा भाजप ही स्पर्धा काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांकरता सोपी राहील. आणि हे तेव्हाच होऊ शकेल, जेव्हा भाजपला २३० पेक्षा कमी जागा मिळतील.

४. ‘समाजवादी पार्टी + बसपा’ चाल

कुठलेही राज्य हे आकाराने मोठे नाही आणि कोणतेही राज्य उत्तर प्रदेशहून महत्त्वाचे नाही. जितक्या जागा भाजपला मिळतील, त्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या प्रमाणात असतील. काँग्रेसने गेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीशी युती केली होती. त्यात त्यांच्यासोबत बसपाला एकत्र घेणे आवश्यक होते. जर भाजपला एकत्रित अशा काँग्रेस, सपा आणि बसपाशी लढावे लागले असते, तर त्यांना लोकसभेच्या ८० पैकी ३० हून अधिक जागा मिळाल्या नसत्या. जर बसपाने त्यांचा स्वत:चा उमेदवार उभा केला, तर भाजपला जास्तीच्या २५ जागा सहज मिळू शकतात. आणि जर सपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढायचे ठरवले, तर भाजप २०१४ च्या त्यांच्या बेरजेपर्यंत (मित्रपक्षांच्या अतिरिक्त २ जागांसह) पोहोचू शकते. अर्थात, हे साऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसचे काम स्पष्ट आहे. उत्तर प्रदेश ४० हून अधिक जागांबाबत भाजपच्या एकूण बेरजेत बदल घडवू शकतो.

५. थोपवण्याची चाल

काँग्रेसला राज्य विधानसभा निवडणुकीतील भाजपची घोडदौड थोपवणे आवश्यक आहे. कर्नाटकने ही संधी देऊ केली आहे. आगामी निवडणुकीत केवळ तिथे जिंकणे आवश्यक नसून या वर्षाच्या उत्तरार्धात राजस्थान आणि मध्य प्रदेश या मोठ्या राज्यांमधील किमान एक तरी निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. (अर्थातच, लोकसभा निवडणूका लवकर घेतल्या जाणार नाहीत, या गृहितकावर हे बेतले आहे.) दिवसाअखेरीस, केवळ विजय लक्षात राहतो आणि राज्य विधानसभा निवडणुकांमधील २०१४ पासूनची काँग्रेसची कामगिरी वाईट आहे. गुजरातमध्ये अटीतटीची लढाई झाली, मात्र शेवटी गुजरात भाजपच्या हातात राहिले. मतांचा वाटा वाढला, पोटनिवडणुका जिंकून काँग्रेसला लहानशी मदत झाली. मात्र खरे बक्षीस म्हणजे जास्तीत जास्त मुख्यमंत्री असणे आणि त्याकरता काँग्रेसला भाजपचे यंत्र थांबवायला हवे.

६. सहा लाखांची चाल

निवडणूक जिंकणे हे नेत्याबाबत आणि संदेशाबाबत असते, मात्र ते संस्थेबाबतही असते. भाजपवर बुथनिहाय, जागानिहाय आणि निवडणुकांत मात करायची असेल, तर काँग्रेसची प्रत्यक्ष मतदारसंघात काम करणारी ताकद त्या त्या ठिकाणी जागेवर असायला हवी. एका साध्या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसने द्यायला हवे : २०१४ साली ज्या निवडणुकीत काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी झाली, असे असले तरी त्या निवडणुकीत १० कोटींहून अधिक मते काँग्रेसच्या पारड्यात टाकणारे मतदार कोण आहेत? हीच राजकीय पक्षांची समस्या आहे की, त्यांना त्यांच्या ग्राहकांची (मतदार) कल्पना नाही. भाजपने २०१४-१५ मध्ये जशा प्रकारे राष्ट्रीय स्तरावर सदस्यत्व मोहीम हाती घेतली, तसेच काँग्रेसनेही करणे आवश्यक होते, त्याचबरोबर प्रत्येक बुथवर पक्षाचा कार्यकर्ता नेमणे आवश्यक आहे. २०० जागांवर लक्ष केंद्रित करायचे म्हटले तर सुमारे ३ लाख मतदान बुथ होतात. प्रत्येक बुथवर, जे २५० कुटुंबांसोबत संपर्क ठेवतील अशा दोन विश्वासू कार्यकर्त्यांची गरज आहे. याकरता पुरेशी माहिती असलेल्या आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेल्या ६ लाख पक्ष कार्यकर्त्यांची फौज देशस्तरावर उभी करणे आवश्यक आहे; जे लोकांचे मन वळवतील आणि लोकांना मतदान करण्यास प्रवृत्त करतील.

७. ‘उलट्या चक्रा’ची चाल

मोदींना वरचढ ठरण्यासाठी, काँग्रेसला ‘मिशन मोहभंग’वर लक्ष केंद्रित करावे लागेल. नरेंद्र मोदी हे साऱ्या राष्ट्राचे आकर्षण ठरण्याची क्रिया खंडित करावी लागेल. हे लक्षात ठेवावे लागेल की, त्यांनी स्वत: नेतृत्व केलेली निवडणूक मोदी कधीही हरले नाहीत. गेल्या दोन पिढ्यांत नाही तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतका हुशार आणि चाणाक्ष पंतप्रधान देशाला लाभला आहे, असे मोदींमध्ये पाहिले जाते. अनेक बाबतीत असलेल्या कमकुवतपणावर काम केले जाऊ शकते. मात्र, इतर कोणत्याही महान नेत्यासारखेच मोदीही चक्र उलटे फिरवण्यात हुशार आहेत. काँग्रेसला व्यक्तीवर नाही, तर त्यांच्या शब्दांवर आणि कृतीवर लक्ष केंद्रित करायला हवे. मोदींवर टीका करणे म्हणजे विराट कोहलीला लो-फुलटॉस टाकणे. काँग्रेसला गेल्या १५ वर्षांत हे शिकायला हवे होते. याकरता काँग्रेसकडे स्वत:चे असे काही चाणक्य असण्याची गरज आहे. काहीशा भीतीदायक आणि विपुल अशा मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांना वळसा घालून आपले म्हणणे मांडण्याचा अवकाश समाजमाध्यमे देतात आणि त्यामुळे खेळ काहीसा समतोल होण्यास मदत होते. मात्र, विषय आणि मजकुराची फॅक्टरी असणे हीच गुरूकिल्ली आहे.

८. गुणपत्रिकेची चाल

भाजपचे चक्र उलटे फिरवण्याचा एक मार्ग म्हणजे भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांसोबत, गेले पाच अर्थसंकल्प सादर करताना आणि विविध भाषणादरम्यान पंतप्रधानांनी आणि इतर मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांवरील भाजपच्या कामगिरीची गुणपत्रिका प्रकाशित करणे. हे प्रत्येक सहा महिन्यांनी करायला हवे- भाजप सरकारच्या कामगिरीचा पाठपुरावा करायला हवा. अजून फार उशीर झालेला नाही. जनता आणि सरकार यांना घडून गेलेल्या गोष्टी विसरण्याची सवय असते- त्यांना या सगळ्याची आठवण करून देणे हे आव्हान देणाऱ्याचे काम असते.

९. रस्त्यावर उतरण्याची चाल

काँग्रेसला लहान आणि प्रादेशिक पक्षांसोबत युती करण्याचे कसब शिकायला हवे, मात्र पक्ष मजबूत झाल्याखेरीज हे होणे मुश्कील आहे. म्हणून, पक्ष मजबूत झाल्याचा समज निर्माण करणे आवश्यक आहे. याचा अर्थ महत्त्वाच्या समस्यांवर भाजपच्या विरोधातील आघाडीचे नेतृत्व करणे. समाजमाध्यमातून केवळ सुरुवात करता येते, ती लढाई रस्त्यावर न्यावी लागते. एखाद्या मुद्द्यावर दृश्य निषेध आंदोलन दिसल्याखेरीज भाजपविरोधी गती वाढवणे शक्य ठरणार नाही. यामुळे काँग्रेसला ज्याची अतीव आवश्यकता आहे, ते रस्त्यावरील बळ एकत्र येण्यासही मदत होईल.

१०. मौनाची चाल

हे साहजिक वाटेल, मात्र निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत, चुका होतात आणि मोदींचा भाजप पक्ष सापळे रचण्यात वाकबगार आहेत. त्याकरता काँग्रेसने आपल्या संदेशाशी चिकटून राहणे आवश्यक आहे आणि त्याचा अर्थ असा की, वेगवेगळे आवाज आणि टिप्पण्या बंद करणे होय. इंग्लंडचे राजकारणी प्रश्नाचे उत्तर कसे देतात ते एका मित्राने मला एकदा सांगितले होते. त्यातील प्रत्येकाकडे दोन ते तीन मुद्दे असतात आणि कोणताही प्रश्न विचारला गेला, तरी त्यांचे उत्तर हे त्यांच्या बोलण्याच्या मुद्द्यांवर आधारलेले असते. अशा प्रकारे काँग्रेसची निवडणूक मोहीम २-३ मुद्द्यांची हवी आणि सारे काही या मुद्द्यांशी जोडलेले हवे. हे होण्याकरता वरिष्ठ स्तरावरून शिस्त लादणे आवश्यक आहे. माझ्या मते, काँग्रेससाठी हुकूमी एक्का म्हणजे राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून लवकरात लवकर जाहीर करणे. भारतातील निवडणुका या कधीही नव्हे इतक्या अध्यक्षीय बनल्या आहेत. चेहरे आणि व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे ठरते. ही एक नेतृत्वाची कसोटी आहे. जेवढ्या लवकर हे घडेल, तितके ते काँग्रेसच्या दृष्टीने चांगले ठरेल. काँग्रेसला १५० जागा मिळणे हे काही संभाव्यतेच्या पलीकडचे नाही. त्याकरता, काँग्रेसला अनेक योग्य गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आणि हे बघायला हवे की, त्यामुळे भाजपला दडपण येईल आणि ते चुका करतील. निवडणुकीत आजही संधी आहे, याचे कारण पहिल्या २०० दिवसांत भाजपने नव्या बुद्धिमत्तेवर विश्वास न ठेवता, मतदारांना हवे असलेले व्यवस्थात्मक परिवर्तन घडवून आणले नाही. ज्याप्रमाणे मोदींनी २०१४ च्या निवडणुका लढवल्या होत्या, त्यासारखाच ‘स्टार्ट अप’सारखा विचार करणे आणि उद्यमशील राहणे ही काँग्रेसकरता आज काळाची गरज आहे.

एक प्रश्न विचारायचा आहे : या दहा चाली राहुल गांधी यांना भारताचे पंतप्रधान होण्याकरता मदत करतील, मात्र हे भारताचे समृद्धी आणणारे पहिले पंतप्रधान होऊ शकतील का?

यासोबतच्या लेखात आणि व्हिडियोमध्ये ,मी नरेंद्र मोदी भारताचे आगामी पंतप्रधान म्हणून कायम राहण्याकरता कोणत्या दहा चाली खेळू शकतील, याची चर्चा केली आहे.