मी भाजप सरकार आणि पंतप्रधानांच्या विरोधात आहे का?

मी भाजप आणि पंतप्रधानांना काही वर्षांपूर्वी दिलेला पाठिंबा पाहता काहींनी मला लिहून विचारणा केली की, आता मी त्यांचा विरोधी बनलो आहे का? या प्रश्नांची उत्तरे मी थेट देणे योग्य ठरेल.

मी भाजप सरकारच्या, कुठल्याही राजकीय पक्षाच्या अथवा कोणा व्यक्तीच्या विरोधात नाही. माझा कधीही नकारात्मक अथवा राजकीय अजेंडा असा काही नव्हता आणि आजही नाही. मला कोणत्याही राजकीय पक्षाशी अथवा व्यक्तीशी भांडत बसायला वेळ नाही. मी उद्योजक आहे, राजकारणी नाही.

भारत हे राष्ट्र समृद्ध व्हावे, याकरता आवश्यक असलेले बदल घडवून आणणे असे माझे ध्येय सकारात्मक ध्येय आहे. या ध्येयाप्रति काम करणाऱ्या प्रत्येकाला माझा बिनशर्त पाठिंबा आहे. आपल्या देशातील व्यवस्था आणि राजकीय प्रक्रिया जी अत्यंत अकार्यक्षम आणि एकतर्फी बनली आहे, त्यात बदल कसा करता येईल, यांवर मी लक्ष केंद्रित केले आहे. उद्योजक म्हणून सकारात्मक बदल, परिवर्तन आणि व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणे हे माझे काम आहे.

कुणा एका व्यक्तीच्या विरोधात मी नाही, मोदींच्या विरोधात तर फारच कमी आहे, हे मी वारंवार सांगत आलो आहे. २०१४ मध्ये मोदींना निवडणुकीत जिंकण्यासाठी सक्रिय पद्धतीने मदत करताना माझा अजेंडा नेहमी जो होता, तोच आजही आहे. भारताला समृद्धी प्राप्त करून देणे हा माझा अजेंडा आहे आणि ज्या कुणाचे हे ध्येय आहे, त्यांचा मी सहयोगी आहे.

भारताच्या प्रगतीविषयी मोदींच्या असलेल्या प्रामाणिकपणावर आणि समर्पणाच्या वृत्तीबाबत मी साशंक नाही. शांतता आणि समृद्धी असे आमचे समान ध्येय आहे. मात्र, वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळे परिणाम साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांवर विश्वास ठेवतात. देशाची प्रगती साधण्यासाठी सरकारने नागरिकांवर आणि अर्थकारणावर अधिक नियंत्रण ठेवणे योग्य नव्हे, हे मला पूर्णपणे पटले आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगाच्या पाठीवर सर्वत्रच असे नियंत्रण ठेवणाऱ्या पद्धतीचा प्रयत्न ज्यांनी कुणी केला आहे, त्यांना सातत्याने अपयश प्राप्त झाले आहे आणि इतर साधनांकडे वळावे लागले आहे.