बदल आणि आशा

माझ्या अर्थशास्त्राविषयीच्या आणि ‘पब्लिक चॉइस’ विषयीच्या संभाषणातून आणि वाचनातून तीन गोष्टी समोर येतात: • भारताची गरिबी ही न बदलता येण्याजोगी गोष्ट नव्हे. भारतातील गरिबी ही मानवनिर्मित आहे, निसर्गनिर्मित नव्हे. ● संपत्तीचे वितरण नव्हे तर संपत्ती निर्मिती हे समृद्धीचे गुपित आहे. संपत्तीचे वितरण हे शून्य अथवा ऋणात्मक होते. संपत्ती निर्मिती मात्र नेहमी धन संख्या येते, कारण निर्मितीतून संपत्ती वाढते. संपत्ती निर्मितीसाठी एक व्यवस्था असते. • असा मार्ग ज्याद्वारे लोकांना संपत्ती निर्माण करता येते, तो अनुसरण्याचे ज्ञान वा प्रोत्साहन भारतीय सत्ताधाऱ्यांना नव्हते. • भारतात आपण आता ज्या मार्गावर आहोत, तो कायमस्वरूपी समृद्धी प्राप्त करण्यासाठीचा मार्ग नव्हे. निराशेची जागा २०१४ साली आश्वासन आणि सकारात्मकतेने घ्यायला सुरुवात झाली. मात्र, आपले नेमके कुठे चुकले? ज्याचे आश्वासन दिले गेले होते, त्या नोकऱ्या कुठे आहेत? ज्यांचे आश्वासन दिले होते, ती नवी शहरे कुठे आहेत ? आपली शिक्षणव्यवस्था का बरे अद्याप बदलली नाही? किमान सरकार आणि कमाल प्रशासनाच्या दिलेल्या आश्वासनाचे नेमके काय झाले? व्यापारउदीम करणे अजूनही का इतके कठीण का ठरते?

अर्थातच, गेल्या काही वर्षांत दृष्टिकोनात बदल झाला आहे. मी ज्यांना भेटतो, त्या सगळ्यांना एकच प्रश्न विचारतो- १६ मे २०१४ रोजी जो आशावाद होता आणि काही वर्षांत भारत काही गोष्टी संपादन करेल, या विषयीच्या तुमच्या ज्या काही अपेक्षा होत्या, त्या अपेक्षांची पूर्तता झाली, असे तुम्हाला वाटते का? याचे वैश्विक उत्तर ‘नाही’ हेच मिळत आहे. अर्थातच, आश्वासने पूर्ण का होऊ शकली नाहीत, याची कारणे देणे तसे सोपे आहे- आर्थिक वारशाकडे बघा, बदल होण्यासाठी वेळ लागतो अथवा इतर पर्याय कोणता? मात्र, जर तुम्हाला वाटत असेल की हेच अचूक उत्तर आहे तर मग भारतीयांना समृद्ध बनवण्याची आशा आपण लवकरच सोडून द्यायला हवी.

एका विशिष्ट क्षणी, मी निश्चित केले की, आता खूप झाले. जसे मी २०१०-११ मध्ये नरेंद्र मोदी यांना स्वत:हून पाठिंबा देण्याचे ठरवले, तसेच मी या संदर्भात काही पावले उचलण्याचे निश्चित केले. पुढील निवडणूक नेहमीचीच- सामान्य बाब नसावी, तोच सत्ताधारी राजकीय वर्ग आपले भविष्य चांगले बनवू शकणार नाही. या विचारांतून ‘नई दिशा’चा जन्म झाला.