भारताच्या सोनेरी क्रीडा कामगिरीचे स्वप्न साध्य करण्यासाठी…!

आशियाई स्पर्धेतील भारताच्या कामगिरीचे कौतुक होत असले तरी आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये भारताचा झेंडा डौलाने फडकावा,यासाठी भारताचा बरीच मजल गाठायची आहे.

जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धांचं सूप वाजलं… स्टेडियम ओकंबोकं झालं आणि अॅथलीट घरी परतले… भारतासाठी यंदाची आशियाई स्पर्धा संस्मरणीय ठरली. भारतीय खेळाडूंनी पदकांचे आजवरचे विक्रम मोडीत काढल्याच्या वृत्तांनी वृत्तपत्रांचे रकाने भरले. खेळाडूंची विपन्नावस्था आणि त्यांनी मिळवलेले यश यांच्या कहाण्यांनी अनेकांचे डोळे पाणावले खरे; मात्र, भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे, अशा आशयाच्या बातम्या फसव्या ठरू शकतील, अशी वस्तुस्थिती आहे. यंदाच्या आशियाई स्पर्धेत क्रीडा क्षेत्रांतील काही विभागांमध्ये भारताची कामगिरी सरस ठरली आहे, केवळ भारतीय अॅथलीट्सनी १९ पदके जिंकली, मात्र, एकूणात भारताची यंदाची आशियाई स्पर्धांतील कामगिरी आधीच्या वर्षांसारखीच- जेमतेम आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये आशियाई स्पर्धेचे स्वरूप विस्तारले आहे. त्यात नव्या उपक्रमांचा, पदके जिंकण्याच्या नव्या संधी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यंदा २६ नव्या उपक्रमांचा आशियाई स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आला होता.

कामगिरीचे मोजमाप हे एकूण संभाव्य पदकांपैकी किती पदके संपादन केली, यावरून स्पष्ट होते. या आघाडीवर भारताने अल्प प्रगती केली आहे. पदके संपादन करण्यात भारताचा २०१४ च्या ३.९ टक्क्यांच्या तुलनेत यंदा ४.४ टक्के असा वाटा वधारला. पहिल्या एशियाड स्पर्धेपासून भारताने एकूण पदकांपैकी ४ टक्के पदके जिंकली आहेत.  चीन, दक्षिण कोरिया, जपान यांच्या तुलनेत भारत बराच पिछाडीवर आहे. या तीन पूर्व आशियाई देशांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील ५० टक्क्यांहून अधिक (५६ टक्के) पदके आपल्या खिशात टाकली.

भारताची आशियाई स्पर्धांमधील सर्वोत्तम कामगिरी यंदाची नाही, तर १९५१ सालची आहे. उद्घाटनाच्या वेळेस आशियाई स्पर्धेत केवळ ८ देश सहभागी झाले होते. त्यात चीन, दक्षिण कोरिया हे देश सहभागी झाले नव्हते. त्या वेळेस भारताने ३० टक्क्यांहून अधिक पदके संपादन केली होती. त्यानंतरच्या कुठल्याच वर्षी इतकी पदके भारत मिळवू शकला नाही.

भारताच्या या कमी दर्जाच्या कामगिरीचे नेमके कारण काय असू शकते? या संदर्भातील संशोधन स्पष्ट करते की, क्रीडास्पर्धांमधील यश हे लोकसंख्या आणि संपत्ती या दोहोंशी निगडित असते. १९५२ ते २००४ दरम्यानच्या ऑलिम्पिकच्या कामगिरीचा २००८ मध्ये एक अभ्यास करण्यात आला, त्यात असे स्पष्ट झाले की, ऑलिम्पिकच्या यशात जीडीपी आणि लोकसंख्या हे दोन घटक सर्वाधिक महत्त्वाचे ठरतात.

अधिक लोकसंख्या म्हणजे अधिक बौद्धिक संपदा, ज्यान्वये अधिक विजेते निर्माण होण्याची शक्यता असते. सैद्धान्तिकदृष्ट्या, भारताचा आकार मोठा आहे, त्यामुळे संभाव्य विजेत्यांची संख्याही अधिक असायला हवी. मात्र, लोकसंख्येचा विचार करता, भारताने केवळ प्रति दशलक्ष लोकसंख्येच्या तुलनेत ०.०५ टक्के पदके जिंकली आहेत.

लोकसंख्येहून संपत्तीचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. या आशियाई स्पर्धांमध्ये ज्या देशांचे दरडोई वार्षिक उत्पन्न (जीडीपी) अधिक आहे, उदाहरणार्थ- कतार, सिंगापूर या देशांनी भारत आणि इंडोनेशिया या तुलनेने जास्त गरीब देशांच्या लोकसंख्येच्या तुलनेत अधिक पदके जिंकली आहेत.

संपत्तीचा थेट परिणाम क्रीडाविषयक करण्यात येणाऱ्या खर्चावर होतो. पैसा आणि क्रीडा विकास यांचा थेट सकारात्मक, सम प्रमाण संबंध असतो.

भारतात, गेल्या काही वर्षांत क्रीडा विषयक होणारा खर्च जरी वाढला असला तरी तसा तो कमीच आहे. यंदा केंद्र सरकारने क्रीडा मंत्रालयासाठी २,१९६ कोटी रुपयांची तरतूद केली. ही तरतूद २०१४-१५ च्या तुलनेत दुप्पट आहे, मात्र तरीही, जीडीपीच्या ०.०१ % आहे. संपूर्ण क्रीडा मंत्रालयाची अर्थसंकल्पीय तरतूद याच टप्प्यात आहे, तर स्वतंत्रपणे कामकाज करणारी बीसीसीआय- बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर इंडियाने २०१५-१६ मध्ये १७१५ कोटी रुपयांचा नफा कमावला. याच तुलनेत, दक्षिण कोरियाच्या क्रीडा मंत्रालयाने २०१४-१५ साली १.१५ अब्ज डॉलर्स (जीडीपीच्या ०.०८%) खर्च केले. क्रीडा क्षेत्रावर मोठा खर्च करणारे हे देश यासाठीचा निधी वेगवेगळ्या स्रोतांद्वारे उभारतात. चीन, जपान आणि दक्षिण कोरिया हे देश क्रीडा क्षेत्रातील गुंतवणूकीकरता निधी उभारणीसाठी पब्लिक लॉटरीचा वापर करतात. मात्र, केवळ किती खर्च केला यावरून यश नक्की होत नाही. चीन, जपान आणि दक्षिण कोरिया हे गुंतवणुकीसोबत योजनाबद्धतेवरही भर देतात. प्रशासकीय सुधारणा, उत्तम प्रशिक्षण, तळागाळातील घटकांचा सहभाग या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

हे सारे भारतासाठीही महत्त्वाचे ठरते. खेळाडूंची गरिबी आणि त्यांचे प्रावीण्य यांचा संबंध जोडत बसण्यापेक्षा क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश संपादन करण्यासाठी या सर्व घटकांकडे पुरेसे लक्ष पुरविण्याची गरज आहे आणि या सगळ्यांत निधी उपलब्धता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, ज्याद्वारे भारताला क्रीडा क्षेत्रात वैभवाचे दिवस प्राप्त होऊ शकतील.