एअर इंडियामध्ये जनतेचा आणखी किती पैसा ओतणार?

वेळोवेळी हजारो कोटींची जनतेची गंगाजळी अर्पण करूनही तोट्यात राहिलेल्या एअर इंडियाचे व्यावसायिकरण करण्याचा नारा पुन्हा एकदा सरकारने दिला आहे.

व्यवस्थापनाने योजलेल्या उपायांद्वारे प्रवाशांना आकर्षित करण्याचे आणि कंपनीचा कार्यभार वाढवण्याचे उद्दिष्ट कर्जाचे ओझे वागवणाऱ्या एअर इंडियाने बाळगले आहे. उद्दिष्टपूर्तीकरता सरकार- एअर इंडियाचे बोर्ड रूमपासून व्यवस्थापनापर्यंत सर्व स्तरांवर व्यावसायिकीकरण करेल, असे नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी अलीकडेच स्पष्ट केले.

एअर इंडियाचा कारभार नीट चालावा याकरता उत्तम संचालक मंडळाची नियुक्ती करण्यासाठी आघाडीच्या उद्योजकांना स्वातंत्र्य देत त्यांची संचालक म्हणून नेमणूक करत आहोत, असेही प्रभू यांनी स्पष्ट केले.

असे असले तरी, एअर इंडियाला २०१७-१८ मध्ये दर दिवशी सरासरी १० कोटी रुपयांचा तोटा झाला, ही वस्तुस्थिती आहे. एअर इंडियाने आजवर ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. मार्च २०१८ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस एअर इंडियाचे विमान खरेदीचे कर्ज १७ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. एअर इंडियाला दैनंदिन कामकाजासाठी ३१,५१७ कोटी रुपयांची आवश्यकता असते. या सरकारी विमान कंपनीचा संचित तोटा ३५७९ कोटी रुपये इतका आहे.

काही महिन्यांपूर्वी एअर इंडियाला विमान चालविण्यासाठी जे इंधन भरावे लागते, त्याची किंमत चुकती करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची उचल करावी लागली होती. २०१७ च्या आर्थिक वर्षात एअर इंडियाने विविध वित्तीय संस्थांकडून ६२५० कोटी रुपये तात्कालिक कारणांसाठी उभे केले होते. अशा या अत्यंत तोट्यात बुडालेल्या एअर इंडियाला नागरिकांच्या अल्पबचत निधीतून आणखी एक हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय सरकारने गेल्या ऑक्टोबर महिन्यात घेतला होता.

जनतेच्या हजारो कोटी रुपयांचा अपव्यय करत आजवर एअर इंडियाचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न सरकारने वेळोवेळी केला आहे. मात्र, तरीही एअर इंडियाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे आजवर कधीही दिसून आलेले नाही.

२०१७-१८ च्या तिसऱ्या तिमाहीत एअर इंडियाचा प्रवासी महसूल ४,६१५ कोटी रुपये होता, तो २०१८-१९ च्या तिसऱ्या तिमाहीत ५,५३८ कोटी रुपयांपर्यंत वाढला. या वाढीचा दाखला देत प्रभू यांनी एअर इंडियाच्या व्यावसायिकीकरणाचा नारा जरी दिला असला तरी ज्या प्रमाणात जनतेचा पैसा एअर इंडियामध्ये ओतला जात आहे, त्या तुलनेत ही वाढ अत्यंत नगण्य आहे. ही वस्तुस्थिती असली तरी एअर इंडियात सरकार यापुढेही अवाजवी पैसा ओतत राहील का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.