देशातील किशोरवयीन मुलींच्या आकांक्षांना कटू वास्तवाची वेसण

देशातील किशोरवयीन मुलींना शिकायचंय, काम करायचंय, पण त्यांना हव्या तशा नोकऱ्या उपलब्ध नसल्याने त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागण्याचीच शक्यता अधिक आहे.

आपल्या देशातील किशोरवयीन मुलींची संख्या ८० दशलक्ष इतकी आहे. त्यांची स्वप्ने आणि वास्तव यांच्यात मोठी दरी असल्याचे ३० राज्यांतील ७४ हजार किशोरवयीन मुलींच्या पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

हा पाहणी अहवाल ‘नांदी फाऊंडेशन’  या एका स्वयंसेवी संस्थेने तयार केला आहे. ही संस्था मुलींच्या सबलीकरणासाठी काम करते. यांतून पौगंडावस्थेतील मुलींचे शिक्षण, करिअर, लग्न आणि अपत्य जन्म यांविषयी सकारात्मक निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.

चांगली गोष्ट म्हणजे, गेल्या दशकात बाल विवाहांची संख्या कमी झाली. ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’नुसार , गेल्या दशकात स्त्रियांचे लग्नाचे सरासरी वय जे १७ वर्षे होते, ते आता १९ वर्षे झाले आहे. १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच लग्न झालेल्या महिलांची टक्केवारी आता २७ टक्के इतकी घटली आहे, जी आधी ४६ टक्के होती. ‘नांदी फाऊंडेशन’च्या या पाहणी अहवालात, किशोरवयीन ९५ टक्के मुली या अविवाहित असल्याचे आढळून आले.

मात्र, तरीही या मुलींना कधी लग्न करावेसे वाटते, आणि प्रत्यक्षात त्यांचे लग्न कधी होते, यांत मोठी तफावत आहे. पाहणी अहवालातील एक चतुर्थांश मुलींना १८ ते २० वयादरम्यान लग्न करायचे आहे, इतर अर्ध्या मुलींना २१ ते २५ वयादरम्यान लग्न करायचे आहे. शहरी मुली आणि श्रीमंत घरच्या मुलींना थोडे नंतर लग्न करायचे असते. पण वास्तवात, देशातील ६० टक्के स्त्रिया- ज्या त्यांच्या विशीच्या सुरुवातीत वावरत आहेत, त्या २० वर्षांच्या असतानाच त्यांचे लग्न झाले आहे. ग्रामीण भागात आणि गरीब घरांतील मुलींचे लग्न लवकर होते, असेही निरीक्षण नोंदवले गेले आहे.

एक मात्र नक्की की, लग्न पूर्वीच्या काळाच्या तुलनेत थोडेसे नंतर होत असल्याने, किशोरवयीन भारतीय मुलींच्या मनात शिक्षण आणि नोकरीचा विषय घोळत असतो. १३ वर्षांच्या ९० टक्क्यांहून अधिक मुली शाळेत जातात. पण माध्यमिक शिक्षणानंतर उच्च माध्यमिक शिक्षणाकडे वळताना मुलींची शिक्षणातील ‘गळती’ सुरू होते. यांत प्रामुख्याने ग्रामीण भागातील तसेच गरीब कुटुंबातील मुलींचा समावेश असतो. १९ वर्षांच्या केवळ ६६ टक्के मुली शिक्षण व्यवस्थेत कायम आहेत.

पाहणीदरम्यान, ७० टक्के किशोरवयीन मुलींनी उच्च शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यातील एक चतुर्थांश मुलींना पदव्युत्तर पदवी संपादन करायची आहे. मात्र, २०११-१२ दरम्यान २० ते ३० वयोगटातील केवळ ३ टक्के मुलींना पदव्युत्तर पदवी प्राप्त करता आली. बहुसंख्य म्हणजेच- १० तरुण महिलांपैकी सहा महिलांनी दहावी/माध्यमिक शालेय शिक्षण प्राप्त केले होते. ‘नांदी फाऊंडेशन’च्या पाहणी अहवालात केवळ १ टक्का किशोरवयीन मुलींनी दहावीहून कमी शिकले तरी चालेल, असे म्हटले. यांतून अधिक शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा सुस्पष्ट होते.

पाहणीतील ७५ टक्के किशोरवयीन मुलींनी शिक्षण संपल्यानंतर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, २०११ च्या जनगणना अहवालानुसार, बालसंगोपन अथवा घरगुती कामांच्या जबाबदारीमुळे, २० ते ४९ वयोगटातील केवळ ५० टक्के महिला नोकरी करत आहेत अथवा नोकरी शोधत आहेत.

किशोरवयीन मुलींना कोणत्या नोकऱ्या करण्याची इच्छा आहे आणि कोणत्या नोकऱ्या त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत, यांत मोठी तफावत दिसून येते. किशोरवयीन मुलींच्या मनात शिक्षिका, शिंपी, डॉक्टर, पोलीस आणि नर्स अशा कुशल व्यावसायिक नोकरीमध्ये कार्यरत व्हावे, असे आहे. या पाहणीत त्यांच्या या आकांक्षांवर प्रकाश पडला. ताज्या ‘अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’नुसार, एक चतुर्थांश तरुण मुलींना शिक्षिका व्हायचे आहे, त्यानंतर डॉक्टर अथवा नर्स होण्याची मुलींची इच्छा दिसून येते. केवळ १ टक्का ग्रामीण युवावर्गाला शेतीमध्ये काम करायचे आहे. मात्र, ‘नॅशनल सॅम्पल सर्व्हे’च्या आकडेवारीनुसार, कुशल शेती काम आणि शेतमजूरी यांत ग्रामीण महिला मोठ्या प्रमाणात काम करतात. शहरी स्त्रिया, कारागिरी आणि घरगुती कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यग्र आहेत.

पहिल्यापेक्षा तरुण मुली अधिक शिकत आहेत आणि आधीच्या पिढ्यांपेक्षा लग्न पुढे ढकलण्यात यशस्वी होत आहेत, मात्र त्यांची स्वप्ने मात्र आपल्या अर्थव्यवस्थेत अधुरी राहण्याचीच शक्यता अधिक आहे, कारण त्यांना हव्या तशा वेतनाच्या नोकऱ्या ही अर्थव्यवस्था उपलब्ध करू शकत नाही.