भारतातील मालकी हक्काची समस्या – १

आपण भारतीय जितके समृद्ध असू शकलो असतो, तितके समृद्ध बनलो नाही, कारण जे खरे तर आमच्या मालकीचे आहे, ते आमचे उत्पन्न, मालमत्ता आणि सार्वजनिक संपत्ती यांची मालकी आमच्यापाशी नाही. याचा नेमका अर्थ काय आणि त्यावर काय उपाय योजण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊयात.

आपण कमावलेल्या बहुतांश उत्पन्नाचे आपण मालक नाही. आपण कमावलेला बहुतांश भाग सरकारच्या दृष्टीने करपात्र असतो. कर भरून मिळालेले उत्पन्न जेव्हा आम्ही खर्च करतो, तेव्हा त्या खर्चावरही सरकार कर लावते. आम्ही मेहनतीने कमावलेला बराचसा पैसा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर काढून घेतो. प्रत्यक्ष कर हा उत्पन्न आणि कॉर्पोरेट कराच्या रूपात तर अप्रत्यक्ष कर वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) आणि आयात शुल्काच्या रूपात आपल्याकडून वसूल केला जातो.

सर्व करांमुळे दरवाढ होते आणि ती शेवटी नागरिक- आपण सगळे अदा करतो. कॉर्पोरेट टॅक्सही आपणच भरतो, कारण कंपन्यांसाठी कर ही अशी रक्कम असते, जी ग्राहकांकडून ज्यादा रक्कम वसूल करून कंपनी अदा करते.

काम करता यावे, म्हणून सरकार कर जमा करते, मात्र अति कर लादणे हे उत्पादनात आणि म्हणून संपत्ती निर्माण करण्यात अडथळे निर्माण करणारे असते. भारतीय करपद्धती विचित्र आहे. उदाहरणार्थ, कृषी उत्पन्नाला करमाफी दिल्याने, करांचे संपूर्ण ओझे अर्थकारणाच्या उत्पादन क्षेत्रांवर आले आहे.

मोजपट्टीच्या अगदी वरच्या उत्पन्न स्तराला सुमारे ३३ टक्के कर बसतो आणि कर वजा करून मिळालेल्या उत्पन्नावर १८ ते २८ टक्के जीएसटी बसतो. श्रीमंत व्यक्ती जी खरेदी करतात, त्यातील कित्येक गोष्टींवर २८ टक्के कर भरणे त्यांना परवडते, या गृहितकावर ही आकारणी करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर तर शंभर टक्क्यांहून अधिक कर बसवला आहे. इंधन दर तर सर्व गोष्टींमध्ये समाविष्ट आहे, ज्या गरीबही खरेदी करतात.

याचा परिणाम म्हणजे तुम्ही कमावलेल्या प्रत्येक १०० रुपयांतील ६७ रुपये तुम्ही घरी नेता. त्यानंतर तुम्ही जेव्हा खर्च करता, तेव्हा त्यातील आणखी २० टक्के जीएसटी घेऊन जाते. म्हणजे तुम्ही केवळ ५३ रुपये अथवा तुम्ही कमावलेल्या १०० रुपयांतील अर्धी रक्कम वापरू शकता. उरलेली अर्धी रक्कम सरकार घेते. याचा अर्थ, वर्षातील सहा महिने तुम्ही सरकारसाठी काम करता आणि नंतर तुम्ही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी काम करत आहात. विचार करा : तुम्ही प्रत्येक वर्षी सहा महिने सरकारचे सेवक असता.

हे असे असायला नको. तुमच्याकडून वाजवी कर आकारायला हवा. तुम्ही जे काही कमावले आहे, त्यातील बहुतांश भाग तुमच्यापाशी राहायला हवा. त्याकरता, सरकार लहान, कार्यक्षम आणि परिणामकारक असायला हवे. सरकारचा वायफळ खर्च आणि फुगीर आकार कमी झाला तर जास्त कर आकारण्याची गरजही कमी होईल निष्क्रिय मालमत्तेला उत्पादन प्रक्रियेत समाविष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न वाढवता येईल. (या मुद्द्यावर पुढील लेखात सविस्तर माहिती देत आहे.) यांमुळे आपल्या खांद्यावरील कराचा अधिक बोजा कमी होईल. …………………