माझी कथा. तुमची कोणती आहे?

आपल्यातील प्रत्येकाची एक कथा असते. आपले नवे सामायिक भविष्य निर्माण करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाची कथा एकत्र करायला हवी. मी माझी कथा तुम्हाला सांगतो.

मी ५० वर्षांपूर्वी कर्जात बुडालेल्या कुटुंबात जन्माला आलो. माझ्या वडिलांनी घेतलेल्या मेहनतीची आणि उद्योजक प्रवृत्तीची मला चांगले शिक्षण घेण्यात मदत झाली. सुरुवातीला भारतात आणि नंतर अमेरिकेत मला उच्च शिक्षण घेता आले. अमेरिकेत दोन वर्षे काम केल्यानंतर वडिलांनी बोलावल्यानंतर मी भारतात उद्योजक होण्याकरता परतलो. तंत्रज्ञान विषयक उद्योजक म्हणून मी १९९०च्या उत्तरार्धात भारतातील इंटरनेट पोर्टल्सचा पहिला संच तयार केला- समाचार, खोज, खेल आणि बावर्ची. आशियातील डॉटकॉम क्रांतीचा मी अग्रणी होतो. मी १०० डॉलरमध्ये संगणक बनविण्यासंबंधीचे काम केले (जे न्यूजवीक मासिकात कव्हर स्टोरी म्हणून प्रकाशित झाले.) आजच्या घडीला असणारी भारतातील सर्वात मोठी डिजिटल मार्केटिंग कंपनी मी सुरू केली.

२००८च्या उत्तरार्धात माझा राजकारणाच्या काठावरचा प्रवास सुरू झाला. एका मित्राने विचारलेल्या प्रश्नाने हे सारे सुरू झाले: “राजेश, जेव्हा तुझा मुलगा ( जो त्यावेळेस ३ वर्षांचा होता) जेव्हा मोठा होईल आणि तुला विचारेल, पापा, भारतात जे काही चुकीचं घडत होतं, ते तुम्ही पाहात होता. तुमच्याकडे वेळ होता, पैसा होता. तुम्ही त्याबाबत काही केलं का नाही?” या मित्राच्या प्रश्नाने मला विचार करायला भाग पाडले. उद्योजक म्हणून मला कठीण समस्या सोडवायला आवडते आणि नि:संशयपणे  भारतातील सर्वात मोठी समस्या प्रशासनाची आहे. मग मी ठरवलं, हे एक आव्हान म्हणून स्वीकारूयात आणि काय करता येईल ते पाहूयात. त्यामुळे मी राजकारणाच्या जगातील परिघावर प्रवेश केला.

शहरी मध्यमवर्गाचा भाजपाला पाठिंबा मिळावा, याकरता २००९च्या सुरुवातीला, काही जणांसोबत आणि भाजपाच्या मदतीने मी फ्रेंडस् ऑफ बीजेपी स्थापन केले. निवडणुकीत भाजपा हरली, आणि मध्यमवर्गाला राजकारणात गुंतवण्याची कल्पनाही काही काळापुरती गोठून गेली.

२०१० मध्ये मी पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांना भेटलो आणि त्यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान बनावे, याकरता मला काम करायला आवडेल, असे त्यांना मी सांगितले. मी असे त्यांना म्हटले, याचे कारण भारताचे नेतृत्व करण्याकरता आणि भारतात परिवर्तन करण्याकरता तेच सर्वोत्तम व्यक्ती आहेत, असे मला वाटले होते.