भारतात ‘समृद्धी क्रांती’ होण्याची गरज

मी गेली काही वर्षे भारतीय दहा पटीने श्रीमंत का नाहीत, हा विचार करण्यात खूप वेळ व्यतीत केला.

काही वर्षांपूर्वी सिंगापोर, दक्षिण कोरिया आणि चीन या देशांच्या उत्पन्नाचा स्तर भारताइतकाच होता. आज मात्र, आपण मोठ्या फरकाने सर्वात तळाच्या स्थानावर आहोत. सर्वसामान्य सिंगापोरचा नागरिक सर्वसामान्य भारतीय नागरिकाच्या तुलनेत ३५ पट अधिक श्रीमंत आहे. याचे कारण काय?

आपली शिक्षणव्यवस्था आपल्याला अपयशी का ठरवते? जर तुम्ही युवा असाल आणि वरील १० हजारांपैकी एक नसाल (तुमच्या वयाच्या इतर अडीच कोटींपैकी) तर तुम्हाला उत्तम दर्जाचे शिक्षण भारतात मिळू शकत नाही, आणि जर तुमच्या पालकांनी तुम्हाला परदेशी पाठवण्याकरता एक कोटी रुपयांची बचत केली नसेल, तर तुमचे भविष्य काय असेल? आणि जर तुम्ही ग्रामीण भारतात जन्माला आलात, तर तुमचे भविष्य अधिकच अंध:कारमय असू शकते.

आणि समजूयात, की तुम्ही भारतात शिक्षण घेतले आहे, तर मग उत्तम नोकरी मिळण्याची किती शक्यता आहे? नोकऱ्या आहेत कुठे? खासगी क्षेत्र संपूर्ण गुंतवणूक करत नाही. आणि जर ते गुंतवणूक करतात, तर ते अधिक मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबो यांवर गुंतवणूक करतात. आपण आपल्या समकक्ष असणाऱ्या अमेरिकी, जर्मन अथवा चिनी लोकांहून कमी स्मार्ट आहोत, असे नाही. तरीही, आपले भविष्य इतके फिके का?

आपल्यापुढे दोन पर्याय आहेत- एकतर आपण जगभरातील सर्व क्षुल्लक मुद्द्यांची चर्चा करत राहूयात. जसे की, भारताला राम मंदिराची गरज आहे का, त्याची चर्चा करत राहूयात. आपण चर्चा करत राहूयात की आपल्याला आपल्या भयंकर अशा शिक्षण व्यवस्थेत अथवा नोकऱ्यांमधील शिपाई अथवा झाडूवाल्यासारख्या कामांमध्ये आरक्षणाची गरज आहे का? शेती कर्जमाफीची गरज कुणाला आहे, याचीही आपण चर्चा करू शकतो.

किंवा आपण समृद्धीची चर्चा करू शकतो. आपण श्रीमंत कसे बनू याची चर्चा आपण कधी करणार? गरिबी हे आपले भाग्य नाही आणि कधीही नव्हते हा विश्वास आपल्याला कधी वाटणार? झाले तितके पुरे झाले. जे काही वरवरचे बदल केले जात आहेत, त्याने परिस्थिती फारशी बदलणार नाही. भारताला आता एका क्रांतीची गरज आहे. राजकीय आणि आर्थिक क्रांती- जी जगभरातील सर्वात मोठ्या समृद्धी विरोधी यंत्रणेला- जिने भारतीय सरकार हे नाव धारण केले आहे, तिला नष्ट करेल.

काम करण्याचे नवे मार्ग अनुसरून आणि नव्या दिशेने प्रवास सुरू करून येत्या दहा वर्षांत प्रत्येक भारतीय दहा पट श्रीमंत होऊ शकेल. आपण असा प्रवास सुरू करण्याची गरज आहे, ज्यात व्यक्ती म्हणून केवळ तुम्ही महत्त्वाचे ठरता. मी माझ्या पुढील लेखांमध्ये याबाबत अधिक लिहीन.