माझा राजकीय प्रवास सुरूच राहिला

२०११ मध्ये मी “Project 275 for 2014” हा ब्लॉग लिहिला. तीन वर्षांनी येणाऱ्या नियोजित पुढील लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळावे, याकरता भाजपाने काय करायला हवे, याचा एक आराखडा मी त्यात मांडला होता. १७५-१८० जागा भाजपा जिंकेल या अपेक्षेच्या पल्याड पाहणारा मी पहिला होतो आणि त्या दृष्टीने मी एक अत्यंत वेगळी अशी योजना बनवली. भारतासाठी अत्यंत आवश्यक असलेला बदल घडवून आणण्याची संधी या दृष्टीने मी याकडे पाहिले आणि हे प्रत्यक्ष सत्यात उतरावे, म्हणून मी माझा स्वत:चा वेळ आणि पैसा यात गुंतवला.

२०१२ च्या सुरुवातीला, मी निती– न्यू इनिशिएटिव्ह टु ट्रान्सफॉर्म इंडिया सुरू केली. निती डिजिटलने प्रसारमाध्यमे, डेटा, विश्लेषण आणि स्वयंसेवी व्यासपीठ सुरू करण्यावर लक्ष केंद्रित केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारमोहिमेत मोदींना ज्या विविध उपक्रमांची मदत झाली, त्यात नितीचाही समावेश होता. भारतात परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही आणि इतर सल्लागारांनी मोदींशी ज्या विशिष्ट भूमिकेबाबत चर्चा केली होती, ती प्रक्रिया ते लवकरच सुरू करतील, अशा विश्वासापोटी माझ्या मनात हे पुरते स्पष्ट होते, की निवडणूक पार पडल्यानंतर मी माझी तंत्रज्ञान कंपनी चालविण्याकडे पुन्हा परतेन.

तीन वर्षांपूर्वी जी आशा मी व्यक्त केली होती, अगदी त्यानुसार मे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाने बहुमत संपादन केले. गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच एक पक्षाने स्वबळावर राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकीत बहुमत संपादन केले. मोदींनी पंतप्रधान व्हावे, यासाठी नितीने आखलेली मोहीमही फत्ते झाली आणि मी तंत्रज्ञानाच्या जगताकडे परतलो.

नव्या सरकारच्या पहिल्या काही महिन्यांत बदलांचा मंद वेग पाहून भारतातील परिवर्तन कसे दिसेल आणि ही प्रक्रिया वेगवान कशी करता येईल, याचा खोलवर विचार मी करू लागतो. भारताला समृद्धीच्या वेगवान रुळावर आणण्याकरता काय करता येईल, याचा माझा विचार सुरू झाला. सर्वप्रथम मी भारतात बदल घडवून आणण्याची कल्पना सुचवली होती आणि प्रशिक्षित अर्थशास्त्रज्ञ अतानू डे यांच्या ‘Transforming India.’ या पुस्तकामार्गे  स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले होते. माझ्याकरता निति डिजिटलचे काम आणि २०१४ च्या निवडणुकांचे प्रयोजन भारताला श्रीमंत बनवणे हे होते.

अशा प्रकारे- भारत का गरीब राहिला आहे, काही राष्ट्रे श्रीमंत कशी बनली, लोकांना समृद्ध बनविण्यासाठी भारतात काय करणे आवश्यक आहे हे समजून घेण्याचा माझा एक आगळा प्रवास सुरू झाला. पुढील वर्षी मी अनेक लोकांशी बोललो, अर्थशास्त्र आणि पब्लिक चॉइसविषयीच्या जागतिक परिषदांना उपस्थित राहिलो आणि या विषयांवर बरेच वाचन केले.