‘नई दिशा’ची प्रक्रिया आणि व्यासपीठातील नाविन्यपूर्णता

देशाला समृद्ध बनविण्याकरता, नागरिकांना केवळ राजकीय स्वातंत्र्याची नव्हे तर आर्थिक आणि व्यक्ती स्वातंत्र्याचीही गरज असते. वेगवेगळ्या कारणांपायी, भारतीयांकडे सर्वंकष स्वातंत्र्याची वानवा आहे. भारतीयांना व्यापक स्वातंत्र्य मिळावे याकरता सक्षम करण्याचे प्रयत्न ‘नई दिशा’ करेल, हे व्यापक स्वातंत्र्य आजवर भारतीयांना नाकारण्यात आले आहे. केवळ ब्रिटिश राजवटीतच नव्हे, तर १९४७ साली स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतरच्या प्रत्येक सरकारनेही नागरिकांना व्यापक स्वातंत्र्य नाकारले आहे.

भारत आणि भारतीयांना व्यापक स्वातंत्र्य मिळावे, याकरता नागरिकांना आणि राजकीय पक्षांना ‘नई दिशा’ने सक्षम करण्याचे निश्चित केले आहे. प्रत्येक सरकारने जशा प्रकारे दशकानुदशके साध्य न होणारी अस्वास्तव आश्वासने दिली आहेत, तशी आश्वासने देण्यात ‘नई दिशा’ला अजिबात स्वारस्य नाही. कुठल्याही राजकीय पक्षाने अथवा सरकारने असे कधीच म्हटले नाही की, ते भारतीयांना गरीब ठेवण्यासाठी काम करतील, मात्र, त्यांनी नेमके हेच साध्य केले आहे. त्यांनी जे करण्याचे आश्वासने दिले होते, तो परिणाम त्यांनी कधीही साध्य केला नाही. कारण परिणाम काय असेल, याचे आश्वासन कधीच कुणी देऊ शकत नाही.

‘नई दिशा’ची नाविन्यपूर्णता ही प्रक्रियेत आहे. समृद्धी निर्माण करण्याकरता प्रक्रियांची घडी व्यवस्थित बसवणे हे आपण करू शकतो. जर प्रक्रिया उत्तम असेल, तर प्राप्त परिस्थितीत परिणामही उत्तम प्राप्त होतात.

अशा प्रकारे, ‘नई दिशा’ ही नाविन्यपूर्ण प्रक्रिया आहे आणि असे व्यासपीठ आहे, जे सारी व्यवस्था बदलू शकेल, जेणे करून भारतीय नागरिक संपत्ती निर्माण करण्यास मुक्त होईल. केवळ नागरिक संपत्ती निर्माण करतात, सरकार किंवा राजकीय पक्ष संपत्ती निर्माण करत नाहीत. ‘नई दिशा’ जे राजकीय परिवर्तन आणेल ते केवळ साधन आहे, साध्य नव्हे. स्वत: समृद्ध होण्याकरता आवश्यक असलेले स्वातंत्र्य मिळण्यास ही प्रक्रिया नागरिकांना वाव देते.

‘नई दिशा’ भारताला समृद्ध बनवू शकत नाही, केवळ भारतीय नागरिकच भारताला समृद्ध बनवू शकतात, हे आपण लक्षात घ्यायला हवे. मात्र, संपत्ती निर्माण करण्यासाठी नागरिकांना स्वातंत्र्य मिळायला हवे. सरकारी नियंत्रणापासून मुक्त होण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेद्वारे लोकांना सक्षम करणारे ‘नई दिशा’ हे एक व्यासपीठ आहे. लोकांना हतबल करणाऱ्या वरिष्ठ पातळीवर घेतल्या जाणाऱ्या श्रेणीबद्ध केंद्रीकरणाऐवजी ही नाविन्यपूर्ण प्रक्रिया विकेंद्रीकरणाला उत्तेजन देते.

निवडणुकीत मत देण्याच्या रूपात भारतीयांना राजकीय स्वातंत्र्य आहे. मात्र, हे स्वातंत्र्य अतिशय मर्यादित आहे. कोणाला मत द्यायचे, याचे फारच थोडे पर्याय भारतीयांना उपलब्ध आहेत. प्रामुख्याने, निवडणूक कोण लढवणार हे राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतात. तो उमेदवार खरोखरीच लोकांचा प्रतिनिधी आहे का, याबाबत लोकांची मते लक्षात घेतली जात नाहीत.

नागरिकांकडे सत्ता हस्तांतरित करून ‘नई दिशा’ राजकीय स्वातंत्र्य वृद्धिंगत करते. यांमुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या हातातून सत्ता काढून ती लोकांकडे सुपूर्द केली जाईल. आपले प्रतिनिधीत्व कोण करणार, हे ठरवण्यासाठी नागरिक ही सत्ता उपयोगात आणतील.

उमेदवार नेमका कोण असावा, हे अनेक पर्यायांमधून निवडण्याची मुभा ‘नई दिशा’ची नाविन्यपूर्ण प्रक्रिया नागरिकांना देते. ही तळातून वरच्या दिशेला झेपावणारी लोकशाही आहे. या लोकशाहीमुळे वरून खाली येणारे श्रेणीबद्ध नियंत्रण जे राजकीय भ्रष्टाचाराचा गाभा आहे, ते मोडून पडेल.