पुतळे विरुद्ध जिती-जागती माणसं

नागरिकांची स्थिती अधिकाधिक बिकट होत असताना देशाच्या महान नेत्यांच्या पुतळे उभारणीसाठी अव्वाचे सव्वा खर्च केल्यानेच या महान नेत्यांचा गौरव होणार आहे का?

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्तावित पुतळा उभारण्याच्या ठिकाणी बोट उलटून झालेल्या अपघातानंतर एक प्रश्न सर्वांच्याच मनात पिंगा घालतोय तो हा, की देशाच्या चालत्याबोलत्या लोकांना या पुतळ्यांचा नेमका काय लाभ होऊ शकतो?

प्रकल्पाचा खर्च सुरुवातीला अंदाजे २७९ कोटी रुपये इतका होता. हा आकडा पुतळ्याच्या उंचीसोबत फुगत चालला. मार्चमध्ये, सरकारने लार्सन अँड टुब्रोच्या अभियांत्रिकी समूहासह पहिल्या टप्प्यासाठी २,७१३ कोटी रुपयांचा करार केला. दुसऱ्या टप्प्यासाठी, अनेक लँडिंग जेट्टी आणि हेलीपोर्ट लागणार आहेत, प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च आणखी १,१७४ कोटींनी वाढतो.

कालच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील भव्य पुतळ्याचे अनावरण झाले. पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) प्रारूपाच्या माध्यमातून हा पुतळा उभारण्यात आला, त्यातील बहुतांश पैसा गुजरात सरकारने उभा केला. गुजरातच्या राज्य सरकारने सरदार पटेलांच्या पुतळ्याकरता राज्याच्या गेल्या दोन अर्थसंकल्पात सुमारे ७०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. २०१४-१५ च्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात, पुतळ्याच्या उभारणीसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या दुर्गम भागात पर्यटकांच्या सोयीसाठी राज्य सरकार ५२ खोल्यांचे तीन-तारांकित हॉटेल आणि २५० तंबूंचे ‘तंबू शहर’ वसवत आहे.

अलीकडे झालेला हा खर्च पाहता कुणालाही अचंबा वाटेल की, हाच पैसा जर गरिबी आणि भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी, देशाची कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी जर उपयोगात आणला गेला असता, तर ?

विविध विकास निर्देशांकात आपल्या देशाची कामगिरी अत्यंत वाईट आहे, काही बाबींमध्ये तर ती आपल्या शेजारच्या राष्ट्रांपेक्षा कितीतरी वाईट आहे. आधीच तुटपुंजे असलेले स्रोत जित्या-जागत्या लोकांवर वापरण्याऐवजी सरकारने ते पुन्हा वृत्तपत्रांचे मथळे होऊ शकतील, अशा प्रकल्पांवर केवळ राजकीय लाभ मिळवण्याकरता खर्च केले आहेत.

अलीकडेच घोषित झालेल्या जागतिक भूक निर्देशांकात ११९ देशांच्या यादीत भारत १०३ व्या स्थानी आहे. ज्या ४५ देशांमध्ये भुकेच्या प्रश्नाने  उग्र रूप धारण केले आहे, त्यात भारताचा समावेश आहे. आपल्या शेजारील राष्ट्रांपेक्षा भारताचे या यादीतील स्थान खूपच खालचे आहे. चीन (२५), नेपाळ (७२), म्यानमार (६८), श्रीलंका (६७) आणि बांगलादेश (८६) स्थानावर आहेत. पाच वर्षांच्या भारतीय मुलांमध्ये- पाच मुलांपैकी एक मुलाचे उंचीच्या तुलनेत खूपच कमी वजन असते. यांतूनच कुपोषणाची गंभीर समस्या प्रतिबिंबित होताना दिसते. या बाबतीत आपली स्थिती केवळ युद्धाच्या खाईत पोळून निघालेल्या दक्षिण सुदान देशापेक्षा बरी आहे.

११ ऑक्टोबर रोजी जागतिक बँकेने पहिला मानवी भांडवल निर्देशांक (ह्युमन कॅपिटल इंडेक्स)  प्रकाशित केला, ज्यात सातत्यपूर्ण विकास आणि गरिबी निवारण लक्षात घेऊन पहिलावहिला ह्युमन कॅपिटल इंडेक्स जाहीर करण्यात आला. यांत पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यूदर, शिक्षणाची गुणवत्ता आणि मात्रा, प्रौढांचा जगण्याचा दर, खुरटलेली वाढ असे निर्देशांक लक्षात घेत जन्माला आलेले मूल त्याच्या १८व्या वर्षापर्यंत मानवी भांडवल बनू शकते का, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

या निर्देशांकात १५७ देशांच्या यादीत भारत ११५ व्या स्थानी आहे. आपल्या शेजारील राष्ट्रांचा जीडीपी कमी असला तरी ते आपल्या कितीतरी पुढे आहेत. बांगलादेश १०६ व्या क्रमांकावर आहे, म्यानमार १०७ व्या क्रमांकावर आहे, नेपाळचा क्रमांक १०२ वा आहे आणि श्रीलंका ७२ व्या स्थानावर आहे.

६०० जिल्ह्यांमध्ये केलेल्या पाहणी अहवालात असे स्पष्ट झाले आहे की, पौगंडावस्थेतील ३९.८ टक्के मुली अजूनही खुल्या जागेवर शौच करतात. हा आकडा ग्रामीण भागात ४८ टक्क्यांपर्यंत वाढतो. देशातील प्रत्येक दुसऱ्या पौगंडावस्थेतील मुलीला रक्तक्षयाची समस्या असून त्यांचा बॉडी मास इंडेक्स कमी आहे.

अलीकडेच बोट उलटून झालेल्या ‘त्या’ दुर्घटनेत एकाचा जीव गेला. यांवर पर्यावरणतज्ज्ञ डेबी गोयंका यांनी प्रश्न उपस्थित केला की, विद्यमान स्मारकांची दुर्दशा झाली असताना महाराष्ट्र राज्य सरकार या प्रकल्पावर एवढे कोटी रुपये खर्च करण्यास का इच्छुक आहे? शिवाजी राजांनी बांधलेल्या किल्ल्यांची दुरुस्ती ते का करत नाहीत?

आरोग्य, शिक्षण आणि देशाच्या नागरिकांच्या एकूण विकासाबाबत इतके  भयानक आणि टोकदार अंतर निर्माण होत असताना इतका अतोनात पैसा पुतळ्यांवर खर्च करण्याची खरोखरीच आवश्यकता आहे का?

ज्या महान व्यक्तींचे पुतळे बांधले जात आहेत, त्यांनी त्यांचे जीवन जनतेच्या सर्वसमावेशक आणि एकत्रित विकासासाठी व्यतीत केले. आपल्या देशबांधवांचा इतका पैसा वापरून आपल्या पुतळ्याचे प्रदर्शन मांडले जाणे, त्यांना तरी मानवले असते का? एक मात्र खरं, की या देशात पुतळ्यांना जित्या-जागत्या माणसांपेक्षा ‘अच्छे दिन’ येत आहेत.