ब्रिटिश राज – २.० संपण्याची वेळ आली

आपल्या सभोवताली  भ्रष्ट, लोभी, सत्तालोलुप राजकारणी आहेत, जे आपले स्वातंत्र्य आणि संपत्ती हिरावून घेतात. सत्तेवरील त्यांची पकड अधिक घट्ट व्हावी, म्हणून ते समाजातील एका समूहाला दुसऱ्यांविरोधात खेळवतात. त्यांच्या धोरणामुळे आपल्याला नोकऱ्या मिळत नाहीत आणि उत्तम भविष्यापासून आपण वंचित राहतो. देशातील एकामागून एक येणाऱ्या सरकारांच्या काळात दारिद्र्य कायम राहिले आणि समृद्ध होण्यापासून त्यांनी आपल्याला परावृत्त केले. सत्ता अधिकाधिक वरिष्ठांकडे एकवटली आहे आणि नागरिक व नागरी संस्था पुरत्या हतबल बनल्या आहेत.

कृषी क्षेत्रावरील असंख्य नियंत्रणांमुळे शेतकरीवर्ग दु:खात आहे. दशकानुदशके शिक्षण क्षेत्रावरील नियंत्रणामुळे युवापिढी बेकार बनली आहे. गलथान नियमांद्वारे दशकानुदशके चालत आलेल्या सरकारी नियंत्रणांमुळे लहान आणि मध्यम व्यापार खुरटला आहे. सरकारच्या मदतीने अतिश्रीमंत, नफेखोर व्यवसायिकांनी बँकांना लुटले आहे. मुख्यमंत्र्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण न केल्यामुळे शहरांचे प्रशासन अत्यंत वाईट स्थितीत आहे.

राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाढत्या सत्तेमुळे आणि मागण्यांमुळे भ्रष्टाचार सुरूच राहिला आहे. राजकारण्यांची चौकशी यंत्रणा आणि न्यायिक प्रक्रियेवर पकड असल्याने कुठल्याही गुन्ह्यातून ते सहीसलामत

निसटतात. सरकारच्या तालावर आणि जाहिरातींवर पोसलेल्या प्रसारमाध्यमांच्या मथळ्यांचे व्यवस्थापन केले जाते. सार्वत्रिक ओळख क्रमांकामुळे आपले खासगी आयुष्य धोक्यात आले आहे. काही ठराविक गटांना सरकारने डोळ्यांवर पट्टी बांधून घेत मोकळे रान दिले आहे, त्यामुळे आपले स्वातंत्र्यही धोक्यात आले आहे.

त्यांच्यापैकी कोण सत्तेत आहे, याने फरक पडत नाही. प्रत्येक सरकारने मागील सरकारची वाईट धोरणे पुढे चालवली आहेत, स्वातंत्र्यावर आणि व्यापारउदीम करण्यावर बाधा आणणारी काही धोरणे नव्याने सुरू केली आहेत. प्रत्येक सरकारने सातत्याने जनतेचे स्वातंत्र्य कमी केले आहे, आपल्या उत्पन्नावर आणि संपत्तीवर कर लादला आहे आणि समृद्धीच्या मार्गापासून आपल्याला आणखी दूर नेले आहे. प्रत्येक अपयशानंतर सरकार विस्तारत गेले आहे.

काही अभिजात वर्गांचे आणि काहींच्या हितसंबंधांचे रक्षण बहुसंख्यांवर नियंत्रण ठेऊन करणे थांबायला हवे. आपण त्यांचे गुलाम व्हावे, यासाठी जे आपली ताकद वापरतात, त्या सर्व पक्षांच्या राजकारण्यांना नामोहरम करण्यासाठी आपण एकत्र यायला हवे. सरकारने आपल्या मर्यादेत काय करावे आणि काय करायलाच हवे हे लक्षात घेण्यासाठी आपण एकत्र येऊन सरकारला मागे रेटायला हवे. आपण या राज– ब्रिटिश राज २.० विरोधात एकत्र यायला हवे. आपल्या संपन्न भविष्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य संपादन करण्याची गरज आहे.

अपडेट राहा

तुमच्या व्हॉट्स अप क्रमांकावर दररोजच्या ताज्या घडामोडी मिळवा.

आपण आवड दाखवल्याबद्दल धन्यवाद.

एसएमएस अपडेटसाठी मिस कॉल द्या ९२२३९०११११

ईमेलवर अपडेट मिळवा

आपल्या इनबॉक्समध्ये दैनिक अपडेट मिळवा

ई-मेल वर अपडेट्स नकोत का?

मोबाइलवर अपडेट मिळवा