हवे आहेत : भारताचे पहिले समृद्धी पंतप्रधान! (आणखी एक पर्याय)

येत्या १४ महिन्यांत, भारतात पुन्हा सार्वत्रिक निवडणुका होतील. जशा गोष्टी दिसत आहेत, त्यानुसार ३३० लोकसभा जागांसाठी संभाव्य विजेता भाजप किंवा काँग्रेस उमेदवार असू शकेल. उर्वरित जागांवर प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य राहील. भाजप आणि काँग्रेस त्यांच्यामध्ये काय सुधारणा करतात, त्यावर त्यांच्यापैकी एक आगामी पंतप्रधान होईल (सध्याच्या आवडत्या मोदींसह).

पण कधीकधी निवडणुका आश्चर्याचे धक्के देतात आणि पंतप्रधान कदाचित इतर कुठल्या युतीमधलाही असू शकतो. तर मग, आगामी निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी किंवा इतर कुणीतरी असू शकतो. वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या संभाव्यतेची नोंद करता येते आणि त्या खेळाची सुरुवात खरी तर झाली आहे. देशात पंतप्रधानपद हे सर्वात महत्त्वाचे असते. पंतप्रधानांच्या कृती आपल्या देशाचे भवितव्य ठरवत असतात.

म्हणून, भारताला कुठल्या प्रकारच्या पंतप्रधानांची गरज आहे, याची चर्चा सुरू करण्याची वेळ आलेली आहे. याआधी बहुतांश निवडणुका या काही ठराविक पक्षांना करावयाच्या मतदानाविषयी होत्या. मात्र, अलीकडच्या काळात निवडणुका अधिक अध्यक्षीय होऊ लागल्या आहेत, म्हणजेच दिल्लीत आपला नेता कोण असायला हवा, हे मतदानाच्या वेळी लोक लक्षात घेतात.

नरेंद्र मोदी, आपले काम चालू राहावे, याकरता मतदारांना जनादेश द्यायला सांगतील. राहुल गांधींचे आव्हान उभे राहू शकते आणि ते देशाच्या नेतृत्वात बदल घडवून आणण्याचे आवाहन मतदारांना करतील. दोन्ही पक्षांकडे नेते आणि त्यांच्या आक्रमक मोहिमांचा ताबा आहे आणि त्यांच्यापाशी सविस्तर जाहीरनामा आहे.

भाजप त्यांच्या कर्तृत्वाविषयी बोलेल आणि १९४७ पासून ५५ वर्षांच्या सत्ताकाळातील काँग्रेसच्या कामगिरीवर टीका करेल. काँग्रेस भाजपने पूर्ण न केलेल्या आश्वासनांना लक्ष्य करेल आणि ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या, त्याविषयी बोलेल. मतदार या युद्धाचे केवळ साक्षी असतील, ज्यात विजेता सर्व काही मिळवतो. प्रत्येक दिवशी काही विधाने अधिक वाढवून व्हॉट्सअपद्वारे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवली जातील आणि आपल्या सगळ्यांच्या निवडीचा दिवस उगवेल.

पुढील निवडणूक येईपर्यंत, एक राष्ट्र म्हणून आपल्याला आणखी काही वर्षे व्यतीत होताना पाहावी लागतील – मागील वर्षांसारखी आणखी काही वर्षे आपण गमावू, ज्यात अनेक हुकलेल्या संधींची वर्षे असतील, वर्षे जी समृद्धीपासून आपल्याला आणखी काही पावले दूर नेतील. हे चक्र कधी थांबेल?